रात्री झोप येत नाही
स्टोरी काही संपत नाही
स्टोरी मधे तो असतो
स्टोरी मधे ती असते
प्रेम त्याचं खूप असतं
तिला मात्र पुरत नसतं
तिला ऑप्शन मिळत जातो
तो मात्र जळत जातो
तिला फरक पडत नाही
स्टोरी काही संपत नाही
तिचं वय अल्लड दिसतं
त्याचं वय वाढत असतं
व्यसनं बिसनं करून होतात
तिचे सल्ले फुगत जातात
त्याचा प्रश्न सुटत नसतो
तिलाही तो कळत असतो
तरी पाझर फुटत नाही
स्टोरी काही संपत नाही
तिच्या अपेक्षा थोर असतात
त्याची ध्येय बोर असतात
तिला दुर्लक्ष जमत असतं
त्याचं लक्ष लागत नसतं
मिळकत कायम तोकडी असते
तिची अपेक्षा वेगळी असते
तिला तडजोड पटत नाही
स्टोरी काही संपत नाही
त्याला ती बायको वाटते
तिला तो मित्र वाटतो
त्याची आई ऐकत नसते
तिचे बाबा बोलत नसतात
त्याला मित्र चिडवत राहतात
तिला वहिनी म्हणू लागतात
कुणीच मागे हटत नाही
स्टोरी काही संपत नाही
त्यानं प्रपोज करून होतं
तिनं अपोज करून होतं
फ्युचर आस्पेक्ट तिचे असतात
पास्ट एक्सपेरिअन्स त्याचे असतात
तिचं सगळं करेक्ट असतं
त्याचंसुध्दा चुकत नसतं
लग्न मात्र जमत नाही
स्टोरी काही संपत नाही
रात्री झोप येत नाही
सर्कल पूर्ण होत नाही
नशीब कधीच हरत नाही
स्टोरी काही संपत नाही