Monday, February 9, 2015

भावनेचा पेच आहे

भावनेचा पेच आहे 
गीत नेहमीचेच आहे 

मागचे झाले शहाणे 
लागली मज ठेच आहे 

आमुच्यातील क्षीण नाते 
टाळण्यापुरतेच आहे 

रोज मृत्यु धीर देतो 
"संपले, इतकेच आहे"

सत्यतेच्या उंब-याशी 
दार स्वप्नांचेच आहे 

सौख्य बेसावध जरासे 
दुःख टपलेलेच आहे 

"बाकी ?" तिने म्हणता क्षणी
माझे "असो" ठरलेच आहे  

कुठला श्रावण

कुठला श्रावण, कसला श्रावण
जरा दाटले, फसला श्रावण

दूर कुठेशी वीज चमकली
अन् वा-याने पुसला श्रावण

तिने जराशी पाठ फिरवली
लगेच मग हिरमुसला श्रावण

दुःख नभाशी भरून आले
तरी सरीतून हसला श्रावण

बराच लपला-बिपला तरीही
जागोजागी दिसला श्रावण

पारावरले मित्र हरवले
पिंपळ सळसळ झाला श्रावण

गतकाळाची जखम निवळली
तरी जरा ठसठसला श्रावण

असो, म्हणूनी आला होता
असो, म्हणूनो गेला श्रावण